ना धो महानोर ,निसर्ग अन सौंदर्य श्रीधर तिळवे नाईक 

केशवसुतांनी सौन्दर्यवाद सुरु केला असं म्हंटल जातं प्रत्यक्षात त्यांनी फुल्यांचा सुधारणावाद अन युरोपियन सौन्दर्यवाद ह्यांचा मिलाफ केला त्यांनी वेदांताशी हितगुज केले मराठी कवितेत पुरोगामी व्यक्तिवाद रुजवला पण ते कधीही निसर्गाशी एक होऊ शकले नाहीत मात्र महात्मा फुल्यांच्या कविता ग्रामीण कवितेचा आरंभबिंदू असला तरी सौन्दर्यवादात केशवसुतांची एक खेडे ही कविता आरंभ मानली जाते केशवसुत ह्यांना निसर्गाशी एक होता आले नाही तरी बालकवींना ही किमया औदूंबर कवितेत साधली मग माधव ज्युलियन वैग्रे आले त्यापूर्वी चंद्रशेखरांचे काय हो चमत्कार हे खंड्काव्याही महत्वाचे !  हा मार्गी मराठी सौन्दर्यवाद बहरला तो आरती प्रभू व ग्रेस ह्यांच्यात ! 

ह्या मार्गी सौन्दर्यवादाला छेद देणारी  देशी मराठी सौन्दर्यवादाची परंपरा आपल्याकडे सुरु केली ती पु शि रेगे सुगी लिहणारे ग ल ठोकळ व बा भ बोरकर ह्यांनी ! मात्र ह्यांच्यात एक तत्व मिसिंग होते ते म्हणजे कृषितत्व ! ह्यांच्यापैकी कोणीही शेतात न्हवता (ठोकळ काही प्रमाणात अपवाद असावेत ) त्यामुळं ज्यांनी शेतीची कामं केलंत त्यांना ह्या कविता आवडल्या तरी त्यात आत्मा न्हवता एका अर्थाने शहरी संस्कृतीतील लोकांचे किंवा देशी वाड्यात बसून देशी सरंजामशाहीचे समर्थन करत शेती चालवणाऱ्या लोकांचा निसर्गविषयक जिव्हाळा त्यांच्यात होता अशावेळी पोटी संस्कृतीतून शेतात राबणारी  कुणबाऊ संवेदनशीलता घेऊन अवतरलेली पहिली कविता पोटी संस्कृतीतून येणे अटळ होते तशी ती बहिणाबाई चौधरींच्या कवितेत आली तिने अनेक ग्रामीण कवींना ताळ्यावर आणले 

ना धो महानोर हे ह्या बहिणाबाईंच्या सौन्दर्यवादातले दुसरे पायोनियर कवी होते विंदा करंदीकरांच्या भाषेत सांगायचे तर पहिले बृहत्कवि ! ते वाड्यात बसून शेती न्याहाळत न्हवते तर प्रत्यक्ष शेती करत होते . साहजिकच 

ह्या शेताने लळा लाविला असा असा की,

सुखदुःखाला परस्परांशी हसलो-रडलो.

आता तर हा जीवच अवघा असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो

असं म्हणतच ते मराठी कवितेत अवतरले शेतीचा हा लळा त्यांच्या कवितेचे मर्मस्थान होते अन रानातल्या कविता ह्या काव्यसंग्रहात त्यांची बोली हिरवी बोली होती 

शेती करणाऱ्या शेतकऱ्याची प्रार्थना काय असते त्याचे पसायदान काय असते 

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोंधळ्याला चांदणे लखडून जावे.

तर शेतकऱ्याचे पसायदान हिरव्या बोलीने शब्दबद्ध करत मातीतले चैतन्य गात ही कविता आली ह्यातल्या काही कवितांच्यावर बोरकरांच्या बोलीचे प्रभाव होते उदा 
फुलात न्हाली पहाट ओली क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
रंग फुलांवर ओघळताना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले
निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणा कुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी
अर्थात शेवटच्या ओळीत महानोरी ठसा आहे 

मात्र बालकवींची निसर्गचित्रे बोरकरांच्या भाषेत सांगायचे तर चित्रवीणा महानोरांनी स्वतःच्या भाषेत पेलायला सुरवात केली होती उदा 
नदीकाठावर कर्दळीचे बन पाण्यात निथळे
बांधाला लागून गव्हाचे पिवळे शेत सळसळे
आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपता झेपेना
गाभुळ्या चिंचेला नवतीचा भार पोटी धरवेना
माघातले ऊन झेलताना अंग झाले निळेभोर
पाणमळ्यातील शेलाट्या वेलींचे नव्याने उभार
कोण्या बसंतीचे पाऊल लचके इथे चंद्रगौर
डोळ्यात फुलांच्या राजसपणाचा झडे शिणगार
कुसुंब्या रात्रीची स्वप्ने वेटाळून होते फुलवण
नदीकाठावर शब्दांत बावरे लयवेडी धून
ह्या कवितेत महानोरी चित्रशैली व चित्रलय आहे राजसपणाचा झडलेला शिणगार हा विषय आहे पण तो उभा करताना निसर्गचित्राचा वर्णनात्मक बाज ठेवला गेलाय दुसरीच ओळ निसर्गाकडून शेताकडे लक्ष वळवते अन चिंचेला नवतीचा भार पेलत नाही शेलाट्या बांधाच्या वेलीला नव्याने आलेले उभार पेलवत नाहीत निसर्गात घडणाऱ्या शृंगाराची पार्श्वभूमी अशा रीतीने तयार करत मग कोण्या बसंतीचे पाऊल येते निसर्ग अन शृंगार एक होऊन जातात 
मराठी कविता बसंतीच्या पावलासारखी एक पाऊल पुढे टाकते 

महानोरांची लयीच्या दृष्टीने लक्षणीय असलेली कविता 
पक्ष्यांचे लक्ष थवे
गगनाला पंख नवे
वार्यावर
गंधभार
भरलेले ओचे,
झाडांतुन
लदबदले
बहर कांचनाचे,
घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे.
ही होती 

पावसाच्या येण्याची अशी आकाशी लय मी क्वचितच ह्यापूर्वी अनुभवली असेल  ह्यातली घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे.ही ओळ तर कायमच माझ्या मनात ठसली लदबदले हा शब्दही असाच भरलेले ओचे आधी आल्याने तो लय उंचावत न्हेतो 

फ्रॉस्टच्या कवितेतील निसर्ग माणसासाठी आहे. तर वर्डस्वर्थची निसर्गावर कमालीची भक्ती आहे. पण महानोर निसर्गाशी एकरूप झाले आहेत असं महेश एलकुंचवारांनी म्हंटल आहे ते रानातल्या कवितेला परफेक्ट लागू होतं 

अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो
अन् उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो
ही पुरोगामी आशावादी सांगता आहे 

अगदी वही ह्या काव्यसंग्रहातही हा आशावाद टिकून आहे पहिल्याच कवितेत 

रुजे दाणा दाणा
ज्येष्ठाचा महिना
मातीतला
गंध ओला
चौखूर दिशांना
पाखरांचे पंख, आम्हा
आभाळ पुरेना

असं म्हणत ही वही अवतरते 

राघू उठून जाताना फांदी हले झुले
पानांतल्या थेंबांपाशी नभ उतरले
नभ उतरले गर्द जांभळीचे झेले
झुलणार्या फांदीपाशी पैंजण वाजले
गोरे भुरे पाय असे गाण्यात सांडले
झुलणार्या झाडासाठी राघू पुन्हा आले

अशी खास मनोहरी शैली इथे आहेच 

राजसा
जवळि जरा बसा
जीव हा पिसा तुम्हाविण बाईऽ
कोणता करू शिणगार सांगा तरि काहीऽ
ही मूळची कविता आहे हे अनेकांना माहीत नाही 

शेतीचा लळा लागलेला मनोहर बहर हळूहळू काळवंडायला सुरवात झालीये ह्याची जाणीव पावसाळी कवितेत जाणवते ३३ मध्ये ते 
हे खेडे अंधाराचे
हे खेडे प्रकाशाचे
जन्मोजन्मी लक्तरलेले
दुःख घेऊन चालत आले.
मर्तिकाच्या दुःखापरीस
पांघर घालून आयुष्याची
लखलख उन्हात न्हाऊन धुवून
बरसातीला गाणे गाते.
हे खेडे मोरापरीस
मेघासाठी थिरकत जाते.
ढेकळांच्या गर्तेमधून
मृगामधले गाणे गाते
– माती नवा जन्म घेते.
असे येते 
अंधार प्रकाशाचा खेळ आता एकत्र दिसतो 

खेड्यातल्या माणसाला सर्वाधिक महत्वाचा असतो तो गोतावळा व आप्तावळा सगेसोयरे दूर चालल्याची खंत महानोर 

जन्मापासूनचे दुःख जन्मभर असे
जन्मभर राहो, मला त्याचे न फारसे
सार्‍यांसाठी झाले उभ्या देहाचे सरण
सगेसोयरे कधी जातात दुरून.

अशी व्यक्त करतात मात्र रानाची साथ तुटत नाही त्यामुळेच 

डोळे गच्च अंधारून. तेव्हा माझे रान-
रानातली झाडे मला फुले अंथरून.

त्यांचे पळसखेडची गाणी हे संकलनही उत्कृष्ट ! 

पुढं मग प्रार्थना दयाघना असो किंवा गंगा वाहू दे निर्मळ असे संग्रह येतात  शेतीच्या दुर्दशेची कविता अवतरायला लागते प्रार्थना अधिक तीव्र बनतात पर्यावरणाचा ढासळलेला समतोल त्रास द्यायला लागतो 

पाणी पाणी पाणी आणि पाणी पाणी पाणी
पाण्यविना दाही दिशा आम्ही अनवाणी
सोडोनि संसार गेलं देशांतरा कोणी
तळे मळे ओस झाले पाण्याच्या कारणी
कुठा ना ओलवा कोणा सांगावी कहाणी
कबीराचा दोहा आता जगण्याकारणी.
सांगावी वेदना कोणा ऐकेनाच कोणी
त्यांचा आसनाला नाही दु:खाची लागणी
लाख येओव मोर्चा ह्यांची मात्र पूजाअर्चा
राज्य बुडो आलो तरी वांझोटीच चर्चा
चर्चा फार झाली आता सोसेना काहिली
भित्र्या स्वातंत्र्यात आम्हा म्याय कशी व्याली?

कुणबी हळहळू देव करायला लागतो महानोर अपवाद नाहीत त्यामुळेच मग ते 

कोरड्या शेतीची पंढरीची वाट
तुझा भिमाकाढ कारुण्याचा

ओस झाला सारा चिमना संसार
डोळ्यात अंधार पांडूरंगा

यमुनेचे पाणी यावे कावेरीला
तापी नर्मदेला गंगा यावी

तुझी चंद्रभागा घालून वळसा
अजिंठ्याचा देशा थांबवावी

पाण्या पावसाचे बांधून वेटोळे
अंथरावे जाळे पांडूरंगा

साद घालतात आज तर शेतीची अवस्था ह्याहून भीषण आहे 

महानोरांनी साठोत्तरी देशी वाणाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याची कविता लिहिली ती पुढे न्हेणारे इंद्रजित भालेराव , राजन गवस विठ्ठल वाघ श्रीकांत देशमुख संतोष पद्माकर पवार असे वारसदार त्यांना लाभले आहेत 

महानोरांनी उत्तरार्धात देशीवादाशी जुळवून घेतले होते कारण तेच मुळात देशी संस्कृतीत दाखल झाले होते त्याचे पडसाद म्हणून त्यांच्या कवितेचे वारकरीकरण व्हायला सुरवात झाली होती मात्र शेतीशी असलेली त्यांची निष्ठा मात्र तुटली न्हवती आमदार म्हणून त्यांनी ह्याबाबत त्यांना जे जमले त्यांनी केले यशवंतराव चव्हाण ह्यांच्यावरचे त्यांचे पुस्तकही लक्षणीय होते त्यांना माझी आदरांजली 

वैयक्तिक पातळीवर माझ्या आईच्या आवडीचे जे कवी होते त्यातील एक कवी गेला तिच्यासाठी महानोरांच्या अनेक कविता मी कम्पोझ केल्या आणि तिच्यापुढे गायल्याही माझ्या काही मैफिली महानोरांनी समृद्ध केल्या त्या आता सुन्या झाल्या 

सौंदर्यवादाचे देशीकरण घडवून सौंदर्यवादी देशीवाद व पॉटीवाद ह्यांचा समतोल साधणारा अर्वाचीन ग्रामीण कवितेचा पहिला बृह्दकवी गेला आहे आणि शेती अधिकच ओसाडी पेलत तगमगतीये 

श्रीधर तिळवे नाईक 

सुधारणावादी आणि स्वछंदवादी रोमँटिक क्रांतिवादी कलावादी नवंतांना आणि तसल्या कवितांना व लेखनाला भरघोस पाठिंबा देणारे लोक जेव्हा नोबल मिळालेल्या पोस्टमॉडर्न लेखकाचं अभिनंदन करतात तेव्हा ते विनोदी आणि कलोनियल दिसतं 
श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog

पुस्तक परीक्षणे