बाळबोध कवितेतील बाळ बोध नसलेली वैचारिकता आणि गांधी रसेल मार्क्स श्रीधर तिळवे नाईक
बाळबोध कवितेच्या संदर्भात काही प्रश्न अनपेक्षितपणे उपस्थित झालेले आहेत त्यातील एकाचे उत्तर आता मी देत आहे या कवितांच्यामध्ये जी वैचारिकता आलेली आहे ती अनेकांना बाळबोध नाही असे वाटते. मुळातच बाळबोध म्हणजे काय असा प्रश्न आपण विचारायला हवा माझ्या मते फार चिकित्सा न करता आपण स्वीकारलेली मते आपण स्वीकारलेला बोध म्हणजे बाळबोध होय .
मी मागे एकदा लेखात माझ्या वडिलांच्या त्यांच्या गांधीवादाचा माझ्यावर पडलेल्या आणि त्यांनी पाडलेल्या प्रभावाचा उल्लेख केला होता . त्यामुळे लहानपणापासूनच एका अर्थाने गांधीवाद मी घरीच अनुभवलेला आहे. केवळ बापाच्या गांधीवादी आग्रहामुळे मी लहानपणी संडासातल्या गुवाच्या बुट्ट्या उचललेल्या आहेत गटारे साफ केलेली आहेत हमाली केलेली आहे आणि दुकानात स्वच्छता ठेवलेली आहे . त्यामुळेच सर्व प्रकारच्या श्रमांच्या विषयी प्रचंड आदर माझ्या मनात आपोआपच निर्माण झाला . मी लहानपणापासूनच दुकानात काम करतो आहे त्यामुळे व्यवहार मला लहानपणापासूनच शिकवण्यात आला आणि नंतर मला मोक्षाची साधना करताना व्यवहार कसा सांभाळायचा हे शिकायचं नव्हते तर नि :व्यवहारी कसे राहावे कसे जगावे याची प्रॅक्टिस करावी लागली होती. त्यामुळे सर्वसाधारणपणे तारुण्यात माणसे स्वतःला व्यवहारनिपुण बनवण्यात गुंतलेली असताना मी नेमका उलट्या दिशेने वाटचाल करत होतो . त्यामुळेच माझ्या संपूर्ण आयुष्यभर कळत नकळत व्यवहार या गोष्टीचा एक फार मोठा परिणाम आहे आणि पुढे मग त्याची चर्चा ही तत्त्वज्ञानाच्या पातळीवर कायमच मी करत आलेलो आहे.
दुकानांमध्ये कायमच डाव्या लोकांचा दरवळ असल्याने मी मार्क्सकडे खेचलो गेलो कार्ल मार्क्सविषयीच्या चर्चा या माझ्यासाठी फार सामान्य गोष्ट होती मला स्वतःला साम्यवादी राजवट येईल असे या काळामध्ये सांगण्यात आले होते . अर्थातच माझ्यातला व्यवहार जागा असल्याने मला प्रश्न मात्र खूप पडत होते आणि ते सगळे कवितांच्यामध्ये आलेले आहे.
माझ्या वडिलांच्या मुळेच माझ्या आजोबांनी माझ्याविषयी वर्तवलेले भविष्य माहित असल्याने माझ्यावर शैव प्रभाव पडून मी संन्यासी होऊ नये म्हणून काही कट्टर डाव्या विचाराचे शिक्षक आले किंबहुना माझ्या वडिलांनी ते जाणीवपूर्वक आणले .त्या माणसामुळे मी आयुष्यात बर्ट्रांड रसेल वाचायला सुरुवात केली माझ्या आयुष्यामध्ये मी समग्र वाचलेला पहिला पाश्चात्त्य विचारवंत म्हणजे रसेल होय . वाचकांना माझ्या कवितांच्या मध्ये जी काय प्रगल्भता वगैरे दिसते ती सगळी प्रगल्भता बर्ट्रांड रसेल कडून उसनी घेतलेली प्रगल्भता आहे माझ्या आयुष्यामध्ये रसेल आला हे फार बरे झाले . त्याचा तत्त्वज्ञानाचा इतिहास तर मला पाश्चात्त्य देशातले काय वाचायचे आहे याचा आलेख देऊन गेला आणि खुद्द त्याच्या हिस्टरी ऑफ वेस्टन फिलॉसॉफी या ऐतिहासिक ग्रंथाचा सुद्धा माझ्यावर त्या काळामध्ये प्रचंड प्रभाव होता. त्याचे व्हाय आय एम नॉट ख्रिश्चन हे पुस्तक सुद्धा माझ्यावर खूप प्रभाव टाकून गेले. मी धर्माकडे कायमच उघड्या नजरेने पाहू शकलो त्याला कारण रसेल आहे असे मला वाटते.
तेव्हा साहजिकच हे जे प्रगल्भ वैचारिक वगैरे काही आहे ते या तिघांचे आहे . त्यात माझे श्रेय किती हा एक फार मोठा प्रश्न आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये तुम्ही काय वाचता हे फार महत्त्वाचे असते .
आता या सगळ्या प्रकारामध्ये माझे स्वतःचे काही आहे का ? तर व्यवहारामुळे माझ्याकडे आलेली एकमेव गोष्ट म्हणजे जे काही आयुष्य बघायचे असते ते आपल्या स्वतःच्या आयुष्यातील व्यवहाराकडे आपल्या आयुष्यातील अनुभवाकडे बघणे असते ही मूलभूत गोष्ट मी दुकानात शिकलो . दुकानात काम करताना तुम्हाला तुमच्यासमोर असलेले गिराईक त्याची मानसिकता आणि त्याला आज आणि आत्ता करावा लागणारा पुरवठा हे फार महत्त्वाचे बनते. त्यामुळे तुम्ही आज मध्ये जगायला लागता . त्यामुळे कविता ही भानगड मी नेहमीच माझ्या आयुष्याच्या आणि माझ्या अनुभवाच्या संदर्भातच पाहायला शिकलो . गांधी रसेल आणि मार्क्स या तिघांचेही आपण एक कॉमन वैशिष्ट्य बघितले तर ते म्हणजे हे लोक अत्यंत जमिनीशी जोडले गेलेले होते . त्यांनी पाहिलेली स्वप्ने कदाचित भव्य असतील ती जमिनीशी कदाचित तितकीशी जोडली गेली नसतील परंतु त्यांचे आकलन मात्र त्यांनी जास्तीत जास्त वास्तववादी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो .
तरीही या तिघांच्या पेक्षा एक गोष्ट पूर्ण पणे वेगळ्या रीतीने माझ्या आयुष्यात आली ती म्हणजे कला . त्या पार्श्वभूमी विषयी मी इतरात्र लिहिले आहे . माझ्या आयुष्यामध्ये कवितेचा मला झालेला सर्वात मोठा जर उपयोग कुठला असेल तर तो म्हणजे फक्त कवितेनेच मला कल्पनाशक्तीची उडान काय असते ते शिकवले . माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की कविता शिकणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कल्पनाशक्ती कशी राबवायची कल्पनाशक्ती कशी पेलायची आणि कल्पनाशक्ती घेऊन किती उडायचे कसे उडायचे हे शिकणे होय .कल्पनाशक्तीच्या विकासासाठी कविता अतिशय आवश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे . एकाच वेळेला विचारशक्ती ,कल्पनाशक्ती आणि भावशक्ती यांचा अतिशय चांगला मेळ वैचारिकतेची घालत कविता निर्माण करता येते हा मात्र मला फार सुरुवातीपासून लागलेला शोध आहे असे आता दिसते .
तेव्हा माझ्या बाळबोध कवितेमध्ये जो काही वैचारिक आशय दिसतो त्याचे श्रेय हे पूर्णपणे घरातून प्राप्त झालेले बसवेश्वर ,गांधी आणि घराबाहेरून प्राप्त झालेले कार्ल मार्क्स आणि बर्ट्रांड रसेल यांचे आहे.
माझे मित्र या काळात मला कम्युनिस्ट समजत होते ही वस्तुस्थिती . पण दुकानात काम करणाऱ्या कम्युनिस्ट माणसाचा कसा काय स्वीकार करायचा असाही प्रश्न अनेकांना पडत होता ही ही वस्तुस्थिती .
या सगळ्या लोकांचा नि:पात झाला तो शक्ती पातामुळे झाला . शक्ती पाताने या तिन्ही विचारवंतांचा ज्या गोष्टीशी फार संबंध नव्हता अपवाद काही प्रमाणात गांधी त्या मोक्ष या गोष्टीशी माझा संबंध आला आणि प्रत्यक्ष हेच प्रमाण असल्याने मी या लोकांच्या मूलभूत सिद्धांतांच्या पासून फार दूर गेलो . एका अर्थाने शक्ती पाताने माझा बाळबोधपणा संपवला .
मात्र या चार लोकांच्यामुळे माझ्यावर जे श्रमाचे संस्कार झाले श्रम या गोष्टी चे महत्व जितके या लोकांच्यामुळे ठसले (याबाबतीत अर्थातच मातुल घराण्यातून आलेले बसवेश्वर सुद्धा महत्त्वाचे आहेत) ते मात्र मला कधीही पुसून टाकावे असे वाटले नाही . किंबहुना युरो भारतीय समाजाचे सर्वात मोठे वैगुण्य जर काही असेल तर ते म्हणजे श्रमा विषयी युरोभारतीय समाज अत्यंत बधिर आहे. त्याला श्रमाच्या विषयी आदर नाही .मी असा युरो भारतीय बधिर झालो नाही याला कारण हे तीन आणि अर्थातच बसवेश्वर जबाबदार आहेत. मुख्य म्हणजे ह्या सर्वांच्या मागे अत्यंत जाणीवपूर्वक श्रमाचे संस्कार करणारे माझे आईवडील आहेत. शक्ती पाताने श्रमाचा पात केला नाही उलट श्रमांचे महत्त्व अधोरेखित केले . शक्तिपाताने श्रमांचे उन्नयन करायचे असते हे मला शिकवले. भारतामध्ये मोक्षासाठी करावयाचे श्रम अनेकदा केले जात नाहीत आणि लोक मनातल्या मनात मोक्ष मोक्ष बोलत राहतात मोक्षाच्या नावाने मनातल्या मनात मांडे खात राहतात प्रत्यक्षात कृती मात्र करत नाहीत हा माझा अनुभव आहे. श्रमाशिवाय मोक्ष सुद्धा मिळत नाही. मला नेहमीच प्रश्न पडतो की श्रमाचे संस्कार झाले नसते तर मी मोक्षाची उग्र कठोर साधना केली असती का ? त्यामुळे कधी कधी मी विनोदाने म्हणतो माणसाने सुरुवातीला शैव तरी असावे किंवा कम्युनिस्ट असावे म्हणजे मोक्षासाठी श्रम करावे लागतात ते त्याला नीट कळते .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment