१
घरातल्या घरात सकाळी झोपेतून उठणे
म्हणजेच घर असणे
घरी असणे
तुम्ही म्हणालात प्रत्येक गोष्ट आता लिंक झालेली आहे सिंक झालेली आहे
तुम्ही म्हणालात
माझे घर आता जागतिक झाले आहे
मी माझे घर आता लिंक झाले आहे
सिंक झाले आहे
मी तुमच्यावर विश्वास ठेवला
आणि मनात संशय येऊ दिला नाही
तुम्ही माझ्या कोचवर बसून
सिगरेट फुंकत राहायला आयुष्याची
मी म्हणालो की ही जितकी तुम्हाला हानिकारक तितकीच मलाही
पण तुम्ही हे सिंक असणे अमान्य केले
तुम्ही माझ्या किचनमध्ये डोकवलात
आणि म्हणाला ॲमेझॉन शी लिंक करा
मी एक कस्टमर नदी हा घरात घेतली
माझ्या प्रत्येक वस्तूवर तुमच्या डिझाईनच्या
आडव्या उभ्या रेषा
तुम्ही म्हणालात
प्रत्येक डेकोरेशन आता लिंक झाले आहे
सिंक झाले आहे
आणि आता सकाळी मी उठलोय
तर मला माझी ओरिजनल बॉडीच सापडत नाहीये
तुम्ही म्हणताय
लापता लेडीज बघितल्याचा हा साईड इफेक्ट आहे
मी तुम्हाला म्हणालेलो नाही की लापता लेडीज अजून बघितलेलाच नाही
कारण तुम्ही म्हणाल
तू बघ किंवा न बघ
लापता होणे
हे सुद्धा आता आमच्याशी लिंक झाले आहे
सिंक झाले आहे
२
आम्ही सरकारचा त्याग करावा का ?
प्रभावांचा उत्सव
आणि उत्साहाचा कोला
मी घोट घोट घेतोय
स्वतःच्याच नरडीचा घोट घेत
आणि तुम्ही म्हणताय
नर आणि डी
आता सिंक झालेत लिंक झालेत
३
या काळाची भाषा
व्यक्तिगत नाही
आम्ही भाषा सार्वजनिक केलेली आहे
कारण सर्व लिंक करण्यासाठी
ते आवश्यक आहे
एक दिवस असा येईल
आम्ही ढग शेतकऱ्याशी लिंक करून दाखवू
मान्सूनचा अंदाज घेण्यात
मी एक्सपर्ट आहे
मात्र माझे कॅलेंडर अधून मधून अलीकडे दुष्काळ दाखवते
दुष्काळ लिंक होत चाललाय हे तुम्हाला दिसते आहे का
की प्रत्येक लिंक अस्तित्वात नसलेल्या पाण्यात तुम्ही भिजत ठेवलेली आहे ?
मला माहित आहे
सरकारचे डोके ठिकाणावर नसले की ते
लोकमान्य असलेला तिलक लावते
मुख्य आजारी पडलाय
आणि त्याचा असिस्टंट रिप्लेसमेंट म्हणून
सरकार वाजवत
मला मोबाईल मधून वाजणारा पियानो
आता ऐकू येत नाही
माझे बहिरेपण कुंपणावरून उड्या मारत जाते
४
प्रत्येक जागा खचत चाललेली
एकेकाळी माणूस जागेत राहायचा
आता जागा माणसात राहते
अवशेषांचे तपशील टिपायला कॅमेरे
त्यांच्या मांड्या सुद्धा सेक्सी दिसाव्यात म्हणून
अँगल सॉफ्ट
विनाशाचे आवडंबर वाजवण्याची दिवस गेले
विनाश सुद्धा सिनेमॅटिक करून मांडावा लागतो
कसलीही लाज न उरलेले पुरोहित
आता देव सुद्धा कोळून प्यायला लागलेले आहेत
प्लॅटफॉर्म विचारतोय कधी येणार गाडी
आणि गाडी सिग्नल पाशी थांबत
प्लॅटफॉर्म कधी खाली होणार
याची वाट पाहत
बघावे तिथे स्टेशन
झाकावे तिथे प्रवासी
लोकांना प्रवासात कोंडून ठेवले
की त्यांना कोंडमारा जाणवत नाही
त्यांना उगाचच आपण उडतोय असा फील येतो
मी फ्लाय ओवर पुस्तकाच्या पानासारखा उलटतो
शेवटी गडकरींच्या गडांची इज्जत ठेवली पाहिजे
५
लोक आता सर्वत्र आपल्या सावल्या पाठवायला शिकलेले आहेत
सावल्या मोबाईल
आणि माणसे स्वतःतच सावल्यांना टच करत थांबलेली
मी चॉकलेट ओपन करतो खातो
मग किती साखर गेली असेल याचा अंदाज घेतो
मला आद्याप पळता येत नाही
म्हणून मी चालण्याचा आव आणतो
६
माझे आधार
अजूनही लिंक झालेले नाही
आणि बँक म्हणतीये
तुमचे अकाउंट का थांबवू नये
तुम्ही म्हणताय
सर्व काही लिंक झालेले आहे सिंक झालेले आहे
मी आकाश पाहतोय
जमिनीला गुदगुल्या करणारे ढग
मला ऍक्टिव्हेट झालेले दिसत नाहीत
नेमके काय चुकते आहे
की माझ्या लिंक पाशी संपूर्ण पावसाळा थांबलेला आहे ?
७
शिव सगुण की निर्गुण
याची परीक्षा मी तीन वेळा घेतली
आणि तिन्ही वेळा शिव उत्तीर्ण झाला
आता मला त्याची परीक्षा घ्यायची इच्छा नाही
आपल्या बापाला तरी किती वेळा कोर्टात उभा करणार ?
मागील वर्षी मी चुकून म्हणालो
मी छत्री घेऊन बाहेर पडेन पण तू पाऊस पाडायचा नाही
मग वर्षभर मी छत्री घेऊन बाहेर पडलो की पाऊस पडायचा नाही
आता ती छत्री उचलण्याचे धाडस सुद्धा मला होत नाही
आणि तुम्ही म्हणताय
तुमचे आधार कार्ड लिंक होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत
शेवटी सर्व काही लिंक होत आहे
सिंक होत आहे
८
मी हायकूत
फिनिक्सला अंडी घालताना पाहिले आहे
स्विमिंग पूलच्या तळाशी
अख्खा यज्ञ जाताना मी पाहिलेला आहे
पाण्याच्या प्रतिक्रिया
बर्फावर लिहिल्या जातात
आणि वितळवल्या जातात
आता मी तुमचे लोखंडी हातोडे बघत दिवस काढावेत का
संपूर्ण भारतभर बर्फ पडत असल्यासारखे
यज्ञ सेलिब्रेट करणारे लोक
त्यांना कोणीतरी सांगा
हिमालय सोडला
की विंध्य सह्याद्री सुरू होतात
आणि तिथे उन्ह इतके मुबलक आहे की
उन्हाळे दुष्काळ पाठवू शकतात
बर्फात मांडी घालून बसणाऱ्या मूर्ख लोकहो,
हिमालयावरून खाली उतरा
हिमालयावर काल्पनिक स्वर्ग ठेवले म्हणून
नेपाळ आणि तिबेट तुमच्या राष्ट्राचे भाग बनत नाहीत
दंतकथांच्यातल्या लिंक्स केवळ काल्पनिक नाही होत त्या हळूहळू तुम्हाला भ्रमिष्ट बनवतात
तेव्हा सॅडीष्ट होण्याची सवय सोडून द्या
भ्रमांना भ्रमांच्या जागी ठेवा
भ्रमत्यांना यात्रा समजण्याचा काळ कधीच गेला
आता रात्री चंद्रावर अवकाशयान पाठवण्याचे दिवस आलेले आहेत
९
डाव्या बाजूला मोडीत पडलेले अनेक रेडिओ
उजव्या बाजूला कसेबसे उभे राहिलेले पीसीओ
टेबलावर ईश्वर बसलेत
आणि कोण पहिल्यांदा विसर्जन करणार यासाठी भांडण
प्रत्येक ईश्वर म्हणतोय त्याची डायरेक्ट लिंक आहे
तडीपार झालेल्या भाषा
पुन्हा एकदा महापौर पदाची निवडणूक लढवताहेत
मी महाकाव्ये कंपोज करायला घेतली
आणि तोंडघशी पडलो
कधीकाळी तडीपार झालेल्या भाषांनी माझा पराभव केला
१०
हॉस्पिटल्स बूम होतायेत
याला मी प्रगती समजावे का
बढायांच्या मिशा गळून पडतायेत
लेखणीच्या टोकालाच भोके
प्रत्येक भोकात डझनभर उंदीर
मी स्कायसॉफ्ट मधून करून करून किती बोके आयात करणार ?
आकाशांचे स्फोट करणारी ब्रह्मविद्या मला माहित आहे
आता मी आठ ठिकाणी वाकडा होऊन
बहिऱ्या झालेल्या जनकाला गीता सांगावी का ?
११
तुम्ही शिक्षा म्हणून आधार कार्ड लिंक होऊ देत नाही आहात
माझे आयुष्य बँकेबल नाही हे सुदैव
गरिबी शी संभाषण करता येण्याची क्षमता
ही माझी मोक्ष खासियत आहे
खाणे तोंडाशी लिंक करता येते
याला मी आता दिलासा समजावे का ?
आणि उद्या दुष्काळ पडून
पाणी गळ्याची लिंक झालेच नाही
तर त्याला काय समजावे ?
धर्माचे नाव घेतले म्हणून निसर्गाशी कनेक्शन होत नाही
त्यासाठी निसर्गाला आत्मीयता द्यावी लागते
निसर्गाला सिमेंट देणारे लोक
शेवटी त्याचा मेंटेनन्स मोडून काढतात
आपण निसर्गाशी असलेली लिंक मोडून काढतोय मोडीत काढतोय
हे कळण्याची सुद्धा अक्कल तुमच्याजवळ नाही काय ?
आरोप करणाऱ्या लोकांना तुरुंग दाखवणे
याला शौर्य म्हणत नाहीत
गांडूपणा म्हणतात
मी हत्ती टाईप करत चाललोय
आणि तुम्ही नाहीशा होत चाललेल्या सिंहाच्या गर्जना ऐकवत आहात
१२
चारी बाजूने घेराव
सभ्य असणे हाच गुन्हा
दोन्ही बाजूने रानटीपणा चालून आला की
श्वास घुसमटायला लागतो
विश्वासालाच तडे चाललेत
आणि तुम्हाला तुम्ही निर्माण केलेल्या भिंतीतून चाफ्याचा वास येतोय
स्वातंत्र्य हे कधीच कुठल्या गाढवाचे नाव नव्हते
स्वातंत्र्य हे त्या हत्तीचे नाव आहे
ज्याचा एक पाय शहाणपण
दुसरा पाय द्वादशशीलता
तिसरा पाय न्याय
आणि चौथा पारदर्शकता आहे
मी भुकेची प्रॅक्टिस करतोय
शेवटी भुकेहून इंटीमेट ते काय असते ?
१३
गाव म्हणजे इलुजन
शहर म्हणजे डिल्युजन
मुंबईत राहिलो काय
किंवा गावात गेलो काय
आयुष्यातले ॲक्शन सीन संपत चाललेत
लोक म्हातारपणी अपमान करतात
आपणच ते मनावर घ्यायचे नसतात
गळा ताणला गेल्याने फुगलाय
की तहान लागल्याने फुगलाय
मी प्रश्न विचाराला की तुम्ही म्हणताय
सगळे लिंक होते आहे
सगळे सिंक होते आहे
मग माझ्याच आधार कार्डाने तुमचे कोणते घोडे मारलेले आहे ?
मी प्रश्न विचारला
की तुम्ही म्हणताय
तुझ्या आवाजाचा थोडा प्रॉब्लेम झालाय
पण तुझा आवाज आम्ही लिंक करतो आहे
सिंक करतो आहे
१४
सिंक्रोनायजेशन हा सन्मान असतो का ?
त्याच्या प्रत्येक पुलाखालून पाणी वाहत असते का ?
त्या पाण्याच्या आत मासे जिवंत असतात का
त्या माशांच्या आत अवतार जिवंत असतो का
अवतारा मध्ये कोणी देव असतो का
देवामध्ये कोणी मूळ असते का
मुळामध्ये कोणी
असते का ?
१५
पूजा सार्थकपणे प्रयत्न करते
अथकपणे ट्राय मारते
पूर्ण बहिरा आणि अर्धा आंधळा
मला हँगओवर आलेला नाही
पण जिथे स्वातंत्र्याची फुले वेचली
तिथे परंपरेच्या गौवऱ्या का उचलाव्यात
केवळ एखादी गोष्ट गायीशी लिंक झाली म्हणून
पवित्र होते का ?
सतत लिंक लिंक लिंक
जणू लोकांना लिंक होण्याखेरीज काही कामच नाही
वर पुन्हा
आम्ही सांगतो त्याच गोष्टीची लिंक व्हायचे
अशी सक्ती
आता या सक्तीत आणि आसक्तीत काय फरक आहे ?
आग मला टेलीफोन करते
मी म्हणतो
तूच वीज आहेस
हे तू या लोकांना समजावून का सांगत नाहीस
ती म्हणते
मला वेदांच्या मध्ये बंदिस्त केलेले आहे
१६
लोक नेत्यांची निवड करतात
की लोक मूर्खपणाची निवड करतात ?
हा चांगला मूर्खपणा
तो वाईट मूर्खपणा
खरे तर याला झाकले
तर त्याला काढावे
त्याला झाकले
तर याला काढावे
दोघेही जुळ्या भावंडासारखे
यामध्ये परीक्षा कुठे आहे
सगळेच तर फिक्स आहे
१७
मी माझ्या आयुष्याकडून अद्याप राजीनामा मागत नाहीये
कदाचित मी अद्याप
पुरेसा कॉक्रोच झालेलो नाहीये
अभिनेते मरतात
अभिनय मरत नाही
जगण्याचा करेक्ट मूड कुठला
आणि तो कोण कसा पकडतो
टिकटिक करणारी ट्रिक
टॉक टॉक करणारा ट्रेक
पझेशन मागायला जावे
तर आधार कार्ड ची लिंक कुठे आहे
माणसाला फक्त एकच डोळा असतो
दोन डोळे फक्त समतोल दिसावा म्हणून निर्माण झालेले आहेत
या काळाची भाषा कोणत्या डोळ्याने बघावी
जे इंटीमेट आहे
ते इंटिग्रेट नाही
आणि जे इंटिग्रेट आहे
त्याला डोळाच नाही
कुठल्याही पिपासेचे प्रोफाइल आता टिकत नाही
कुठल्याही वासानेला पब्लिश करायला जावे तर
संभाव्य वाचक दिसत नाहीत
त्वचा इंटरव्यू देतायेत
कपडे ब्लॉग टाकतायेत
मेकअप vlogs व्यापून आहेत
यातले आधार कार्ड नेमके काय आहे ?
कि ते माझ्या देहाला इस्त्री करून
त्याला फ्लॅट करण्याची चावी आहे ?
१८
संन्यासाचा चेहरा ओळखता येत नाही
कारण संन्यास म्हणजे ओळखीचा अंत
हवेत दागिने दिसतात म्हणून
मी सोन्याचा भाव विचारावा का ?
शर्वरी अल्फा होऊन आली म्हणून
थोडेच माझे आधार कार्ड दुरुस्त होणार आहे ?
ॲमेझॉनला फ्लिप केले म्हणून
थोडीच त्याची दक्षिण अमेरिकेमध्ये होम डिलिव्हरी होणार आहे ?
माझ्या हातात काहीच नसते
पण निदान माझा हात माझा असावा
इतकी तरी अपेक्षा आयुष्याकडून करायला काय हरकत आहे ?
माझ्या शून्याच्या मुस्क्या तुम्ही बांधू शकत नाही
पण म्हणून माझ्या शरीरावर हव्या तशा रांगोळी काढण्याची परवानगी
मी थोडीच दिली आहे ?
सत्तेचा माज हा मास्क असतो
तो कधीही फाटू शकतो
टेकड्या आणि देव अनपेक्षित पणे कोसळतात
त्यांच्या लँड स्लाइडिंग चा आवाज कुणालाच ऐकू येत नाही
काफ्काचे घड्याळ मरून शतक लोटले
तरी झुरळाचे उत्पादन काही थांबत नाही
झुरळ उलटे पडले की नागडे वाटते
सुलट चालले की कपडे घालून चालते असे वाटते
आता या उलटसुलट मध्ये
काय काय लपलेले
आणि किती टोप्या ?
माझे आधार कार्ड लिंक होत नाहीये
भाषेच्या काचा तडकलेल्या जमिनीवर
अत्याचाराने नागडे दिसू नये म्हणून त्याला कोणते कपडे चढावावेत ?
नागडा माणूस वेडा वाटतो
पण वेडा माणूस नागडा होईलच याची खात्री नसते
याला कपड्यांची ताकद समजावे का ?
१९
मी कधीच माझी त्वचा कपड्याशी लिंक केली नाही
कारण कपडे सामाजिक असतात
याची मला लहानपणापासून जाणीव आहे
शेवटी उसने आणलेले भरत वाक्य
मोक्षामध्ये तरी हिट होत नाही
मोक्षात माणूस आरपार नागडा असतो
तुम्ही प्रयत्न करत रहा
माझा मोक्ष तुमच्या कुठल्याच यंत्रणेशी कधीही लिंक होणे शक्य नाही
बाकी आधार कार्डाचे म्हणाल
तर हेही तसे ठीकच
खाती बंद पडतील
आणि कदाचित माझ्यासाठी आणखी काही आकाशे ओपन होतील
आतल्या आत मरून गेलेल्या माणसाला कैद करता येत नाही
हे कळायला तुम्हाला आणखी किती शतके लागणार आहेत ?
श्रीधर तिळवे नाईक
( मोक्ष सिरीज मधील मोक्ष : स्पंद या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment