अभिजात मराठीत अभिजात कलाकृती का निर्माण होत नाहीत श्रीधर तिळवे नाईक

कुठलीही भाषा अभिजात होण्यासाठी तिच्यामध्ये अभिजात साहित्य निर्माण होणे फार आवश्यक असते साहजिकच मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या अंगाने काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यातील एक प्रश्न म्हणजे मराठीमध्ये अभिजात कलाकृती का निर्माण होत नाहीत हा आहे 


माझ्या मते हा एक फार मोठा गैरसमज आहे आणि तो खुद्द मराठी लोकांच्यातच आहे अभिजात भाषेचा विचार करताना अनेकांनी अत्यंत जाणीवपूर्वक आपला वैष्णव अजेंडा पुढे ढकललेला आहे त्यामुळेच कवितेची सुरुवात ज्ञानेश्वर पासून आणि कद्याची सुरुवात चक्रधरांच्या पासून करणारे अनेक महाभाग येथे झालेले आहेत प्रत्यक्षामध्ये मराठीमध्ये आद्य साहित्य हे शैव आहे हालाची गाथासत सई आणि गुणाढ्यची बृहत्कथा (कथासरित्सा सागर) हे दोन आद्यग्रंथ शैव आहेत आणि त्यामुळेच कविता आणि कथा हे दोन वांग्मय प्रकार हे मराठीचे आद्य वाङ्मय प्रकार आहेत असे दिसते भले मग भालचंद्र नेमाडे काय पण म्हणोत कथा हा मराठीचा एक सर्वश्रेष्ठ वांग्मय प्रकार आहे हे आपण मान्य केले पाहिजे आणि त्याला अत्यंत खोल परंपरा आहे ज्याचा पुरावा म्हणजे गुणाढ्य या लेखकाची बृहतकथा होय


या दोन आद्यग्रंथांच्या मुळेच मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे हे मराठीने विसरू नये आणि साहित्यिकांनी तर ते बिलकुलच विसरू नये अनेक साहित्यिकांना हल्ली याचा विसर पडलेला आहे म्हणून जाणीव करून देतो आहे


यां दोन कलाकृतीच्यानंतर कित्येक शतकांनी झालेल्या निर्माण झालेल्या वैष्णव लोकांना हे श्रेय देणे हा मराठी परंपरेचा अपमान आहे आणि हा अपमान वारंवार केला जातो


पुढेही ज्याला तत्व काव्य म्हणता येईल त्याची सुरुवात ज्ञाननाथ यांनी अनुभवामृत लिहून केलेली आहे त्याच्यावर काश्मिरी शैवागम तत्त्वज्ञानाचा प्रभाव असला तरी त्यात काही स्वतंत्र ही आहे त्यामुळेच अनुभवामृत या ग्रंथाला मी मराठी शैवागम म्हणतो आणि तो शैव आहे आणि तीच मराठी तत्त्वज्ञानाची लिखित सुरुवात आहे


 याचा अर्थ असा नाही की मी वैष्णव साहित्याच्या विरोधात आहे वैष्णव साहित्यात सुद्धा नामदेव आणि तुकारामाचे अभंग ज्ञानदेवांची ज्ञानदेवी अथवा भावार्थ दीपिका एकनाथांचे अभंग आणि भारुडे असे अभिजात साहित्य निर्माण झालेले आहे


विसाव्या शतकामध्ये पू शि रेगे आणि दिलीप चित्रे यांच्या प्रेम कविता नामदेव ढसाळ यांच्या संतप्त कविता अरुण कोल्हटकर यांच्या आधुनिक कविता अशा अनेक क्लासिकस निर्माण झालेल्या आहेत मराठी साहित्याचे मुख्य विधान कविता आहे आणि त्यामुळेच जागतिक दर्जाच्या कविता मराठी मध्ये लिहिल्या जात असतात आणि पुढेही लिहिल्या जातील कवितेनंतर मराठीत कथा हा प्रकार फार प्राचीन आहे साहजिकच मराठीत कथेचे काही क्लासिक्स निर्माण झालेले आहे का असा प्रश्न विचारावा लागेल आणि या अंगाने काही शोध घेणे आवश्यक आहे जी ए कुलकर्णी यांची कथा या निमित्ताने विचारात घ्यावी अशी आहे (आमच्या काळामध्ये सुद्धा सतीश तांबे ते पंकज कुरुलकर असे कथेचे विस्तृत दालन आहे दुर्देवाने त्याचा अभ्यास अत्यंत खोलवर होणे आवश्यक आहे तो झालेला नाही मी स्वतः फार कमी कथा लिहिलेल्या आहेत त्यामुळे कथेवर आपली ऑथॉरिटी किती हा प्रश्न मला नेहमी पडतो जी गोष्ट आपल्यालाच कळलेली नाही त्या गोष्टीबाबत इतरांचे मूल्यमापन कसे करावे हा प्रश्न एक व्यक्ती म्हणून कायम माझ्यासमोर ठाकलेला असतो असो)


या निमित्ताने चर्चेला आलेला प्रश्न म्हणजे मराठीमध्ये अभिजात साहित्य निर्माण का होत नाही एक गोष्ट खरी आहे की अभिजात साहित्याचे प्रमाण पुरोगामी आधुनिक आणि उत्तराधुनिक मराठीत कमी आहे अपवाद फक्त कविता हा वांग्मय प्रकार मुख्य म्हणजे कथा आणि कादंबरी यामध्ये जागतिक दर्जाचे काही निर्माण झाले आहे की नाही अशी शंका सतत निर्माण होते अलीकडे जागतिक पातळीवर कविता कादंबरी आणि नाटक या तीन वांग्मय प्रकारांना प्रचंड आदर आहे कारण कविता ही नवतेची सुरुवात असते आणि कादंबरी अथवा नाटक हा त्या नवतेचा सर्वात शेवटचा आणि अत्यंत व्यापक असा संपूर्ण जीवनाला कवटाळेल असा वांग्मय प्रकार असतो सहाजिकच नोबेल पारितोषिक देताना या कविता कादंबरी आणि नाटक ह्या वांग्मय प्रकारांचा सर्वाधिक विचार होतो मराठीत ज्यांना नोबेल मिळावे असे कवी झाले म्हणजे नामदेव ढसाळ अरुण कोलटकर पण कादंबरी बाबतीत असे काही झाले आहे असे म्हणता येत नाही त्यातल्या त्यात भालचंद्र नेमाडे हेच नाव येते पण आफ्रिकन आणि अमेरिकन कादंबरीकरांच्या तुलनेत त्यांचे सर्व वांग्मय कितपत नवे आहे हा प्रश्न आहे त्यातच सर्व जग उत्तर आधुनिक शैलीत शिरलेले असल्याने त्यांचे पुरोगामी वास्तववादाशी असलेले नाते फार पथदर्शक आहे असे जागतिक पातळीवर वाटत नाही असो 


असो आता आपण मूलभूत प्रश्नाकडे वळायला हरकत नाही तो म्हणजे अभिजात कलाकृती म्हणजे काय? तिच्यात नेमके काय आढळते? 


कुठल्याही कलावंताची त्याच्या कलाकृतीचे सृजन करताना त्या कलाकृतीतील व्यक्त होऊ घातलेल्या अनुभवाशी असलेल्या एकात्मता महत्त्वाच्या असतात ह्या एकात्मता जितक्या तीव्र तितकी त्याची कला प्रभावी होत जाते आणि ती अभिजात बनण्याचे चान्सेस वाढतात अनुभव हा नेहमी एका मागून एक तुकड असल्यासारखा येत असतो हे सर्व तुकडे वेग वेगळ्या कलान्यासात बांधून त्यांच्यातून तीव्र एकात्मता निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक असते अगदी विरचित अनुभव सुद्धा अशी तीव्र एकात्मता निर्माण करू शकतो अनुभवाच्या तुकड्याचे रूपांतरण न्यासिक एकात्म तीव्रतेत करणे हे प्रत्येक अभिजात कलाकृती चे लक्षण आहे यासाठी त्या कलावंताजवळ कौशल्य असावे लागते हे कौशल्य जन्मदत्त कमी आणि श्रमदत्त जास्त असते ते त्याला अनेकदा प्राप्त करावे लागते. जर कलावंत अशा प्रकारचे श्रम करत नसेल आणि केवळ जन्मदत्त कौशल्यावर अवलंबून राहत असेल तर आणि अनेकदा जर हे जन्मदत्त कौशल्य त्या त्या कलाकृतीमध्ये ॲक्टिव्ह झाले नसेल तर त्याची कला तीव्र होत नाही आणि याचा परिणाम अनुभव कोसळण्यात पर्यायाने कला कोसळण्यात होतो


प्रत्येक अनुभवामध्ये प्रत्येक व्यक्तिरेखेचा प्रत्येक वस्तूचा आत्मा वां सत्व हा वेगळा असल्याने प्रत्येक आत्म्याशी सत्वाशी कलावंताला सलग्न व्हावे लागते एकात्म व्हावे लागते एकसत्व व्हावे लागते म्हणजेच दुसरी एकात्मता ही व्यक्तिरेखेबरोबरची वा वस्तू बरोबरची एकात्मता अथवा एकसत्वता असते अगदी चित्रकलेत सुद्धा ज्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे चित्र काढावयाचे आहे त्या व्यक्तीशी किंवा वस्तुशी एकात्म एकसत्व होणे अत्यंत गरजेचे असते ती व्यक्ती जर फुटीर व्यक्तिमत्त्वाची किंवा अमूर्त असेल तर पिकासो सारखे अत्यंत वेगळे व्यक्तिरेखन वा वस्तूरेखनसुद्धा होऊ शकते अनेकदा अनेक व्यक्ती किंवा अनेक वस्तू असतील तर त्यांचे एकमेकांशी असलेले संवादी आणि विरोधी आणि एकात्मक असे नाते एखाद्या सिंफनी सारखे जुळवावे लागते तोल आणि लय सिमेट्रिकली एकत्र न्यावे लागतात तरच उत्तम न्यास तयार होतो आणि न्यास सिमेट्रिक व गहन उत्तम असेल तरच कलाकृती उत्तम होते कुठल्याही अभिजात कलाकृतीमध्ये हे साधलेले दिसते


तिसरी एकात्मता वा एकसत्वता ही त्या त्या अनुभवाच्या एकमेकांशी असलेल्या नेटवर्किंग सिमेट्री मध्ये असते कुठली कलाकृती ही मुलता नेटवर्क असते आणि त्या नेटवर्कमध्ये नेटवर्किंग सिमेट्री असेल तर सर्व व्यक्तिरेखा वस्तू आणि अनुभव एकमेकांशी व्यवस्थित जोडले जातात आणि त्यातून प्रोग्रामड अनुभव अधिक एकसंधपणे अथवा एकसंघपणे उभा राहतो एकसंध आणि एक संघ याचा अर्थ तार्किक दृष्ट्या सरळ रेषीय असा नाही तर महाअनुभवातल्या लयीशी एकात्म वा एकसत्व होय लय ही एकाच वेळेला तर्काधिष्ठीतता आणि सर्व परस्परविरोध पेलत अवतरत असते कले मधील तर्क हा कलात्मक असतो म्हणजेच कलेतील अनुभवाच्या अंतर्गत तो विशिष्ट पद्धतीने प्रवाही होत असतो ही विशिष्ट पद्धत म्हणजेच त्या त्या अनुभवाची शैली बनून जाते 


फक्त एकात्मतेने एकसत्वतेने सर्व काही होते का तर नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते नवता !जर का अनुभवच घीसापिटा , जुनाट , जूनतावादी असेल तर तो फारसा प्रभावी ठरत नाही त्यामुळे अनुभव नवतावादी क्रांतिकारक नसेल तर किमान नवा आणि तेही शक्य नसेल तर किमान ताजा असावा लागतो तो ताजाही नसेल तर ती कलाकृती फाफलत जाते प्रायोगिक नवा अनुभव व्यक्त करताना नेहमीच नवे प्रायोगिक तंत्र शोधणे गरजेचे बनते अशावेळी प्रयोग करणे अटळ असते हे प्रयोग स्वीकारले जात नाहीत अशावेळी आपल्या प्रयोगाशी ठाम राहणे म्हणजेच प्रयोगाशी एकात्म राहणे एक सत्व राहणे होय याला मी प्रायोगिक एकात्मता एक सत्वता म्हणतो ही प्रायोगिक एकता आणि एकात्मता एक सत्वता जर का संस्कृतीकडून आधीच प्रायोजित झालेली असेल तर ती प्रायोगिक उरत नाही म्हणजेच नवते बरोबरच अस्सल प्रायोगिकता हा सुद्धा क्रांतिकारक नवतावादी कलाकृतीचा एक भाग असते आणि अशाच कलाकृती अनेकदा अभिजात बनत जातात कारण परंपरा ही नेहमीच अशा कलाकृतींना सामावून घेत पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असते मराठी परंपरेचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जर कुठला असेल तर तिने आधुनिकता अजूनही सामावून घेतलेली नाही मग पचवणे तर फार दूर आहे त्यामुळेच अनेक कलावंत अजूनही पुरोगामी अथवा रोमँटिक सीजन मध्ये चकरा टाकताना दिसतात आणि जागतिक पातळीवर रोमँटिक सर्वाधिक जुनाट गोष्ट आहे आणि काही वेळा तर कचरा आहे पण मराठी लोकांना आणि संस्कृतीला हे कोण सांगणार? आता तर अवस्था अशी आहे की मराठी लोकांचा रोमँटिक सीजन सुद्धा मराठी राहिलेला नाही त्यांना गुलजार आणि गालिब मोठे वाटतात ज्या लोकांना प्रेम करताना मराठी आठवत नाही ते लोक अभिजात होण्याच्या xxx x तरी आहेत का असा प्रश्न पडतो मराठी संस्कृतीला आधुनिक नवता पचवण्यात आलेले अपयश हे मराठीच्या मुळावर आलेले आहे इंग्लिशमध्ये नवताप्रवीण असणारे लोक मराठीत असले की परंपरा प्रिय का होतात हा एक फार मोठा प्रश्न आहे अजूनही मराठी संस्कृती रोमँटिक सीजन मध्येच भटकताना दिसत दिसते त्यामुळेच आधुनिकता नाही आणि उत्तर आधुनिकता ही नाही मग चौथी नवता तर खूपच दूरची गोष्ट आहे भालचंद्र नेमाडे यांच्यासारखे परंपरा प्रिय लेखक मराठीला आवडतात हे लक्षात घेण्याजोगे आहे अगदी अरुण कोलटकर यांच्या सुद्धा परंपरा प्रिय कविताच मराठीला आवडलेल्या आहेत कोल्हटकर यांची सर्वाधिक गाजलेली कविता वामांगी आहे जी सरळ सरळ परंपरेच्या बाहेर गेल्याचा आव आणत परंपरेचाच पुरस्कार करते म्हणजे एकंदरीत परंपरेच्या बाहेर न पडण्याची मराठीने शपथ घेतलेली आहे आणि मराठीची ही शपथच मराठीत अभिजात वांग्मय निर्माण होऊ देत नाही माझ्या समकालीन असलेल्या अनेक लोकांनी केवळ परंपरा शरण देशीवाद स्वीकारला याचे कारण त्यांना असलेली मराठीकडून मान्यतेची अपेक्षा अभिजात कलाकृती अशी मान्यतेला मोहताज नसते ती आपल्याच तब्येतीत आपल्याच लईच आपल्याच कलंदरपणात आपण कलदार आहोत याची खात्री बाळगत पुढे सरकत जाते मराठीत स्वतःच्या डौलात सरकणारा माणसाला अहंकारी म्हटले जाते साहजिकच अशा प्रकारचा अहंकार कोणी पत्करायला तयार होत नाही वास्तविक अशा वेळेला कलावंताने संपूर्ण संस्कृती फाट्यावर मारावी लागते अशा प्रकारची रिस्क मराठी कलावंत घेतोय असे वाटत नाही त्यामुळेच अलीकडच्या काळात मराठीत किती अभिजात वांग्मय निर्माण झाले असा प्रश्न निर्माण होतो 


मराठीत जे आधुनिक अभिजात वांग्मय निर्माण झाले त्याची चर्चा मराठी माध्यमात किती झाली? हा एक फार मोठा प्रश्न आहे मराठीचा मुख्य मीडिया हा परंपरा प्रिय आहे त्यामुळेच मराठी प्रदेशांमध्येच हिंदुत्ववाद जन्माला आला, वाढला आणि फोफावला अनेकांना हा योगायोग वाटतो पण मला हा योगायोग वाटत नाही कारण मराठी गेली नऊ शतके केवळ परंपरा प्रिय आहे ब्राह्मण्य प्रिय आहे ही परंपरा वैष्णव असेल तर अधिकच उत्तम म्हणजे तुमचे ताबडतोब स्वागत होते मराठीमध्ये शैव होणे हा गुन्हा आहे पण हा गुन्हा केल्याशिवाय पर्याय नाही थोडक्यात काय मराठी संस्कृती मराठी लेखकांना अभिजात वाङ्मय निर्माण करू देत नाही ती वारंवार परंपरेचे घोडे मध्ये घालते आणि त्या घोड्यावर बसवायला आतुर असते व्याकुळ असते आणि शेवटी मराठी लेखक कंटाळून त्या घोड्यावर बसतोच याचे एकमेव कारण मान्यतेची मराठी लेखकांना असलेली आसक्ती! ही आसक्ती फेटाळून लावणे अभिजात वांग्मय निर्माण होण्यासाठी अत्यंत आवश्यक असते मराठीत हे होत नाही म्हणूनच मराठीत अभिजात वांग्मय निर्माण होत नाही किंवा झालेच तर ते खूप कमी असते आणि त्यालाही मराठी संस्कृती लेखक मेल्यानंतरच मान्यता देते मराठीतील हाल, गुणाढ्य,ज्ञानेश्वर ,नामदेव ,तुकाराम या सर्वांची मान्यता मरणोत्तर आहे जिवंत असताना नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे


सर्वसाधारणपणे जे जिवंत असते ते अभिजात असते पण मराठीत मात्र जे मरणोत्तर असते तेच अभिजात असते दरवेळेस स्मशानातून समीक्षा करणाऱ्या मराठी संस्कृतीतून जोपर्यंत मराठी बाहेर पडत नाही तोपर्यंत मराठीतल्या अभिजात वाङ्मयाच्या चर्चा या मरणप्राय यातना देणाऱ्याच होणार 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

पुस्तक परीक्षणे