प्रतिमा , प्रतिमावाद आणि मराठी साहित्य श्रीधर तिळवे नाईक
गेली काही वर्षे फेसबुकवर सतत कवितेतील प्रतिमांची चर्चा होत असते मात्र खोलात जाऊन कुणी हा प्रतिमाविचार कुणी तपासताना दिसत नाही काही जण सुधीर रसाळ ह्यांच्या कविता आणि प्रतिमा ह्या ग्रंथाचा उल्लेख करतात जो योग्यच आहे
मराठीत सत्यकथेने प्रतिमवाद आणला कारण तो पाश्चात्य साहित्यात तसा आणला गेला व नवीन प्रतिमा म्हणजे नवता असा काहीसा विपर्यास त्यातून उदयाला आला आणि त्याला देशीवाद्यांनी मर्ढेकरांना जबाबदार मानले कारण त्यांनी प्रतिमाविचार कवितेची चिकित्सा करताना वापरला होता
मराठीच्या इतिहासाचा विचार करता मराठीत प्रतिमांचा नीट विचार प्राचीन साहित्याच्या अंगाने होणे अपरिहार्य होता आणि तसा तो प्रथम रा श्री जोग ह्यांनी त्यांच्या १९५२ च्या ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ती ह्या ग्रंथात मांडला पारंपरिक आर्य संस्कृत साहित्यशास्त्रात उपमा व रूपक ह्यांचा विचार झाला असला तरी प्रतिमेचा विचार तितका खोल झाला न्हवता ही उणीव भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता व त्यासाठी त्यांनी सी डे लेविस व एज्रा पाऊंड ह्या आधुनिक कवी लेखकांचा प्रतिमाविचार वापरला व ज्ञानेश्वरीतील प्रतिमानांचा विचार सखोल चिकित्सेच्या कक्षात आणला त्यांचे श्रेय फेसबुकवर सध्या कोणी देत नाहीये जो अन्याय आहे त्यांनी इमेजसाठी दिलेला कल्पनाचित्र हा शब्द कुणी वापरत नाही कारण तो इमेज ह्या संकल्पनेसाठी सुसंगत नाही
ह्या ग्रंथात त्यांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील
"कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ पहिला अध्याय ६०॥
ह्या साठाव्या ओवीचे केलेले विवेचन हे एक उत्कृष्ट विवेचन म्हणून आजही पाहता येते
आकाशात चंद्र प्रकटता कुमुदिनी (शुभ्र कमळ )व चंद्र आपला ठाव न सोडता कसा पाण्यातल्या पाण्यात अनुराग भोगतात त्याचे हे चित्र आहे
माझं वैयक्तिक मत असं आहे कि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत विश्वनाथाने सांगितलेल्या उपमा व रूपकांना प्रतिमेपेक्षा जास्त महत्व देतात मी कवी म्हणून रूपक व उपमा ह्यांनाही काव्यघटक म्हणून वापरण्याचे महत्व ज्ञानेश्वरांच्याकडून शिकलो आहे आणि हा विचार अल्पस्वल्प वापरत चौथ्या नवतेच्या अंगाने वर्तमानकालीन करत पुढेही न्हेण्याचा प्रयत्नही केला आहे
ह्यानंतरचा प्रतिमावादावरचा महत्वाचा अभ्यास डॉ . निशिकांत मिरजकर ह्यांनी केला आहे आधुनिक मराठीतील काव्यातील प्रतिमांचे बदलते स्वरूप ह्या त्यांच्या पीएचडी साठी लिहिलेल्या संशोधनात ह्याची सुरवात झाली होती त्यांचे महत्वाचे योगदान म्हणजे केशवसुतांचे क्रांतिकारक महत्व अधोरेखित करताना त्यांनी "विचित्र , विक्षिप्त आणि अनेकपदरी प्रतिमासृष्टी" वापरण्याची सुरवात करणारे केशवसुत हे पहिले कवी आहेत हे अधोरेखित केले होते माझ्या मते एका अर्थाने मराठी काव्यात प्रतिमावाद आणणारे केशवसुत हे पहिले कवी आहेत आणि प्रतिमावादामुळेच ते ज्योतिबा फुले ह्यांनी आणलेल्या प्रबोधनवादी नवतेपेक्षा वेगळे होतात
मिरजकरांनी प्रतिमांचे बारा गुणधर्म (त्यातील नवेपणा , गुंतागुंत , मेळ व उत्कटता माझ्या मते महत्वाचे ) स्पष्ट करून प्रतिमांचे सात प्रकार सांगितले आहेत त्यात बौद्धिक प्रतिमा हाही एक प्रकार आहे जो बौद्धिक कविता लिहिणाऱ्यांना महत्वाचा असणारा व अनेकांना वापरता न येणारा आहे
ह्यानंतरचा विचार अर्थात मर्ढेकरांचा आहे ज्याविषयी मी मर्ढेकरांचे काव्यशास्त्रात लिहणार आहे . त्यांनी प्रतिमावाद आधुनिकतेशी जोडला जोगांनी प्रतिमाविचार प्राचीन मराठी कवितेला , मिरजकरांनी प्रतिमाविचार अर्वाचीन कवितेला तर मर्ढेकरांनी प्रतिमाविचार अर्वाचीन व आधुनिक कवितेला लावून दाखवला
मराठीत देशीवादाचा उदय झाला आणि देशीवादाने तुकाराम मराठीच्या केंद्रस्थानी आणले दिलीप पुरूषोत्तम चित्रे व मालती तु . पाटील ह्यां दोघांनी तुकारामाची प्रतिमासृष्टी व त्यांच्या काव्यात्म शक्तीचे मूल्यमापन ह्या अंगाने मांडलेला काव्यसृष्टीविचार हाही अतिशय महत्वाचा आहे तो जोगांपेक्षा वेगळा होतो तो संस्कृत परंपरेपासून देशी मराठी परंपरा वेगळी काढून !
मालती पाटील ह्या प्रतिमान हा शब्द वापरतात हा शब्द मॉडेल ह्या अर्थाने रुजल्याने तो कोणी इमेज ह्या अर्थाने कोणी वापरत नाही त्यांनी प्रतिमेचा एक गुणधर्म एक वैशिष्ट्यपूर्ण काव्यात्मक वासना असा सांगितला आहे जे मला इंटरेस्टिंग वाटले होते तुकारामाचा संत कवी म्हणून विचार न करता कवी म्हणून विचार करण्याचे त्यांचेही इप्सित असल्याने एकच प्रतिमा तुकाराम कसा वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो ते दाखवत त्यांचे विवेचन होते पुढे म सु पाटील ह्यांनीही हे केले आहे
ह्यांनंतरचा माईलस्टोन मानला जाणारा सुधीर रसाळ ह्यांचा कविता आणि प्रतिमा हा ग्रंथ येतो सांगोपांग प्रतिमाविचार हे त्याचे वैशिष्ट्य !
१ कवितेचे स्वरूप
२ प्रतिमेचे स्वरूप
३ संस्कृत साहित्यातील रूपकप्रक्रिया
४ प्रतिमेच्या मूल्यमापनाचे निकष
व ५ विविध कविताप्रकार (जानर ) व प्रतिमा
अशा पाच अंगानी त्यांनी प्रतिमाविचार मांडला आहे
मी प्रतिमावादी नाही किंबहुना मी सत्यकथावाद व सत्यकथेचा प्रतिमावाद ह्यांना कायमच विरोध करत आलो आहे पण काव्याचे एक साधन म्हणून प्रतिमा व प्रतिमाविचार नीट समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं म्हणूनच ज्यांना कुणाला कविता नीट लिहायची आहे व समजूनही घ्यायची आहे त्यांनी वरील प्रतिमाविचार करणारे मराठी विचारवंत नीट समजून घेणे आवश्यक आहे
प्रतिमा ही अनेकदा नागव्या संवेदनांचा देह असते सायनल र्बॉडीफिकेशन ऑफ न्यूड सेन्सिटिव्हिटी अँड सेन्सिबिलिटी ही माझी प्रतिमेची स्वतःची व्याख्या आहे. मी प्रतिमा ह्या अर्थानेच माझ्या कवितेत वापरतो पण मी प्रतिमवादी नाही
प्रतिमावाद हा कलावाद्यांना व सौंदर्यवाद्यांना कवितेच्या प्रत्यक्ष चिकित्सेसाठी एक आयुध व साधन म्हणून सोयीस्कर असल्याने त्याची भरभराट झाली आणि १९४२ ते १९७० हा २८ वर्षाचा कालखंड प्रतिमावादाचा होता असं म्हणायला हरकत नाही हाच कालखंड सत्यकथेच्या भरभराटीचा होता पुढे देशीवादी केंद्रस्थानी आले खरे पण त्यांनाही प्रतिमाविचाराला प्रत्यक्ष अप्लिकेशनमध्ये फाटा देता आला असं दिसत नाही नव्वोदत्तर पिढीत सचिन केतकरने हा विचार चौथ्या नवतेत पुन्हा आणला व माझ्यावर मी ऍरिस्टोटलच्या मिमेसिस मॉडेलचा पुरस्कर्ता आहे असा चुकीचा ऍटॅकही केला ज्याचा मी प्रतिवादही केला त्यामुळेच मी पुढे अभिधानानंतरला नवसत्यकथावादी म्हणायला सुरवात केली कारण सत्यकथेचा मध्यमवर्गकेंद्रवाद व प्रतिमावाद ह्या दोन्हींचे इथे पुरुज्जीवन होते
प्रतिमा साधन आहे साध्य न्हवे दुर्देवाने सत्यकथेला ह्याचा विसर पडल्याने व पुढे अभिधानंतरला ह्या प्रतिमाविचाराने घेराव घातल्याने मला सत्यकथा व अभिधानानंतर ह्या दोघांनाही टीकेच्या खाली आणावे लागले प्रतिमाविचार ही दुधारी तलवार आहे साधन म्हणून वापरली तर सखोलतेची उत्तम अभिव्यक्ती पण साध्य बनवली तर उथळतेच्या दिवाळखोऱ्या दाखवणारी विलास ! कुठल्या दिशेने प्रतिमा न्हायच्या हे ज्याने त्याने ठरवावे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment